Friday, 19 October 2012

भाव



दंगली-बॉम्बस्फोट असोत, महापूर-अतिवृष्टी असो किंवा रिक्षा-टॅक्सी-लोकल भाडेवाढ असो, सर्व समस्या आपल्या पद्धतीने हाताळून स्वत:ला कमीत कमी मानसिक त्रास करून घेण्याची हातोटी मुंबईकरांच्या अंगवळणी पडली असावी. त्यामुळे मुंबईकरांच्या माथी काहीही मारले, तरी त्यांनी ते निमूटपणे सोसावे व त्याखाली पिचून, भरडून निघावे असा जणू प्रशासन यंत्रणांचा समजच झालेला आहे. आजवरच्या अनेक समस्यांना जेव्हा मुंबईकर याच सहनशीलतेतून सामोरा गेला आणि आपल्या समस्या आपणच सोडवून त्यावर मातही केली, तेव्हा मुंबईकरांवर कौतुकाचा वर्षांव करण्यास मात्र सर्व यंत्रणा आणि पुढारी पुढे सरसावले. मुंबईकरांच्या अंगावर असल्या बेगडी स्तुतीमुळे मांस चढणे आता थांबले आहे. कारण या स्तुतीमागील कांगावा आता मुंबईकरांच्या लक्षात येऊ लागला आहे. एकीकडे स्तुतिसुमने उधळत चुचकारायचे आणि दुसरीकडे समस्यांचे नवे डोंगर लादायचे हेही आता जनतेने ओळखले आहे. शासन-प्रशासन मात्र अजूनही त्याच, जुन्याच गैरसमजांच्या नंदनवनात वावरत आहे. यामुळेच महानगरातील प्रवाशांवर रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा नवा बोजा लादून मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे धाडस केले गेले. रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा आततायी आणि पूर्णपणे नियोजनशून्य निर्णय घेऊन मूठभर टॅक्सी-रिक्षाचालक आणि राजकीय वरदहस्तामुळे शेफारलेले त्यांच्या संघटनांचे मुजोर नेते यांच्या ताटाखाली जाऊन बसलेल्या सरकारने लाखो मुंबईकरांसमोर हा कसोटीचा क्षण उभा केला आहे. रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ जाहीर होताच, मुंबईकरांच्या सहनशीलतेला तडा गेल्याचे चित्र स्पष्टपणे उमटलेच आहे. सामान्य माणसाच्या खिशातील उरलेसुरलेदेखील ओरबाडून काढण्याचे हे कृत्य कोणत्याही लोकशाहीतील कल्याणकारी संकल्पनेला काळिमा फासणारेच ठरेल, पण कोणत्या तरी अनाकलनीय दबावाखाली येऊन रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय घेत जनतेच्या सहनशीलतेलाच आव्हान दिले गेले.

No comments:

Post a Comment