औद्योगिक
उत्पादनाचा निर्देशांक किंचित वर उचलला गेल्याची संधी अहलुवालिया यांनी साधली आणि
पतमापन संस्थांनी भारताबद्दल नकारात्मक दृष्टिकोन टाळावा, असेही सुचविले. अहलुवालिया चाणाक्ष आहेत. मापात कसे बोलावे, हे त्यांच्याकडून शिकावे. घसरण थांबली असल्याने आता पुन्हा विकासाला
वाव आहे असे म्हणता येईल, अशी सावध भाषा त्यांनी वापरली.
सर्व काही एकदम सुधारेल असे मी म्हणत नाही असाही खुलासा त्यांनी केला.
त्यामुळे पतमापन संस्था भुलतील असे नव्हे. आरोग्याच्या भाषेत
बोलायचे तर रक्ताचा आजचा अहवाल चांगला आला म्हणजे रोगी सुधारला, असे म्हणण्याची घाई डॉक्टर करीत नाही. हे अहवाल सातत्याने चांगले असतील
तरच रोगी सुधारण्याच्या मार्गावर आहे असे म्हणता येते. भारताच्या आर्थिक
स्थितीबद्दलही असेच म्हणता येईल. गेले वर्षभर सातत्याने घसरणारे औद्योगिक उत्पादन
जरा सुधारले म्हणजे भारत संकटातून बाहेर आला असे नाही. अहलुवालियांच्या भाषणाचाच
संदर्भ घेतला तर देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होण्यामागे केवळ देशाबाहेरची नव्हे तर
देशांतर्गत कारणेही असल्याचे त्यांनी मुंबईत
म्हटले. आर्थिक सुधारणांचे एक-दोन निर्णय घेतले म्हणजे ही कारणे दूर झाली, असे अहलुवालिया यांना म्हणायचे आहे काय? तसे
असेल तर ते दिशाभूल करीत आहेत. सर्वसामान्य
नागरिकाचे निर्देशांक वेगळे असतात. भाजी-भाकरीचा रोजचा भाव, आरोग्य-शिक्षण व प्रवासाचा खर्च यावर ते ठरतात. औद्योगिक निर्देशांक
वधारला तरी महागाईचा चिमटा कमी झालेला नाही. अहलुवालिया
एकीकडे आशेचा किरण दाखवीत असतानाच महागाईच्या निर्देशांकाने उच्चांक गाठल्याचेही
वृत्त आले. दोन्ही निर्देशांक वस्तुस्थिती दाखवीत असले
तरी प्रत्येक व्यक्ती त्याची सध्याची आर्थिक स्थिती व त्याच्या आशा-आकांक्षा
यानुसार या निर्देशांकांचा अर्थ लावते. पुढील सहा महिन्यांत देशाची स्थिती बरीच
सुधारेल, असा विश्वास अहलुवालिया यांना वाटतो. तशी ती सुधारणे
आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर या सुधारणा बहुसंख्य
नागरिकांच्या रोजच्या जीवनात प्रतिबिंबित होणे अधिक आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment