Saturday, 6 October 2012

पुढे धोका आहे




     काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधींनी आर्थिक सुधारणांचे समर्थन केले होते. कार्यकारिणीपेक्षा जाहीर समर्थन हे केव्हाही अधिक परिणामकारक ठरते. जनमत बदलण्याचा तो एक मार्ग असतो. नेत्यांचा युक्तिवाद जनतेला पटतोच असे नव्हे, पण आपल्याला विश्वासात घेतले जात आहे, ही भावना जनतेत निर्माण होते व त्याचा राजकीय फायदा होतो. काँग्रेस नेत्यांकडून आर्थिक सुधारणांचे असे समर्थन झाले तरच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी गुंतवणूकदार पुढे सरसावतील. तरीही, निवडणूक प्रचारात आर्थिक सुधारणांचे समर्थन करण्याचा धोका सहसा कोणी स्वीकारीत नाही. शायनिंग इंडियाचा भाजपला बसलेला झटका अन्य पक्षांना आठवतो. या झटक्यानंतर भाजपने इतके घूमजाव केले की, हा पक्ष डाव्यांपेक्षाही डावा झाला. शायनिंग इंडियापेक्षा आम आदमीने आपल्याला हात दिला या भावनेमुळे मनमोहन सिंग पंतप्रधानपदी येऊनही गेली सात वर्षे गांधी घराणे वा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून आर्थिक सुधारणांचे जाहीर समर्थन झाले नव्हते. ते गुजरातमध्ये झाले. गुजरातमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याने हा धोका पत्करण्यास सोनिया गांधी तयार झाल्या, असेही कारण यामागे असू शकते.

No comments:

Post a Comment